" पाणी अडवणं आणि ते खेळवणं ही एक नैसर्गिक प्रवृत्ती आहे. पाऊस पडतो तेव्हा आपले डोंगर आपल्यासाठी ते पाणी स्पंजसारखं स्वत:त जिरवून मग झ-याच्या रूपाने आपल्याला बहाल करतात. हे झरे, ओहोळ, ओढे प्रवाहित होत नदीला जाऊन मिळतात.परंतू अलीकडच्या काळात नदीला वाहू च न देण्याच्या माणसांच्या प्रवृत्तीला स्वार्थी नाही तर आणखी काय म्हणायचे ? " हे पुन्हा एकदा ठळक पणे मांडणारा हा लेख…।
पाण्याची माणूसचेष्टा - लेखक पराग पाटील (दै . प्रहार, कोलाज पुरवणीतून साभार )
माकड हा माणसाचा पूर्वज. तरीही माणूस आणि माकडामध्ये उत्क्रांतीने खूप मोठा फरक घडवून आणला. पण पाण्याच्या बाबतीत माणूस माकडापेक्षा फार उत्क्रांत झालाय असं वाटत नाही. माकडचेष्टांना नावं ठेवता ठेवता मानवाने पाण्याची केलेली माणूसचेष्टा उत्क्रांतीच्या नियमाला अपवाद ठरली.त्या झ-याचा उगम वर डोंगरात होता. चढून गेल्यावर दिसलं की झरा जिथून पडायचा तिथे खालीच कुणी तरी छान दगड एकावर एक रचून बंधारा केला होता. एवढ्या उंचावर कुणी एवढी तसदी घेतली, असं विचारल्यावर स्थानिक वाटाड्या म्हणाला, ‘हे माकडांनी बांधलंय.’ हा विनोद असावा असं वाटून आम्ही हसलो. त्यावर तो वाटाड्या पुन्हा ठामपणे म्हणाला, ‘साहेब, खोटं नाही. हे बंधारे माकडंच बांधतात. उन्हाळ्यात पाणी साठवायचं ज्ञान त्यांना उपजतच असतं. दरवर्षी उन्हाळ्यात आम्ही माकडांना असे बंधारे बांधताना बघतो.’
या घटनेनंतर आम्ही सगळेच गप्प बसलो. पण
मनातला हौद ढवळला गेला होता. त्यानंतर कोकणातल्या खेड्यात असाच एक बारमाही
प-ह्या दिसला. त्या प-ह्याच्या उगमाजवळ माकडांचा आणखी एक किस्सा ऐकला,
तेव्हा मात्र हबकून गेलो. उन्हाळ्यात तिथली माकडं या प-ह्याजवळचं पाणी
दगड-धोंडे आणि चिखल वापरून अडवतात आणि एक हौद तयार करतात. पाण्याने हौद
भरला की त्यात उड्या मारून अंघोळ करतात. आणि अंघोळ झाल्यानंतर मात्र हे दगड
काढून टाकून पाणी वाहतं करतात.
किस्सा सांगणारे अतिशयोक्ती करणा-यांपैकी
नव्हते. माकडांच्या या कुवतीबाबत त्यांच्या मनात जराही शंका नव्हती, कारण
ते माकडांना हनुमानाचे वंशज मानत होते. रामसेतू बांधणारीही वानरजातच होती,
त्यामुळे ही ‘वांदरं’ इथे हौद बांधतात त्यात आश्चर्य काहीच नाही, असं
त्यांचं म्हणणं.
माकडांच्या हुशारीशी निगडित पाण्याशिवायचे
अनेक किस्से ऐकलेले आणि बघितलेले. त्यातले बरेचसे साहजिकच मनाला पटलेले.
पण तरीही माकडं पाण्याचा असा हौद बांधतात यावर पटकन विश्वास बसला नाही.
सुगरणीचं निगुतीने विणलेलं घरटं आपण बघतो
आणि अचंबित होतो. मुंग्यांचं वारुळ म्हणजे बांधकामाचा उत्तम नमुना. कुठले
कुठले कीटक झाडांची पानं विणून नजाकतीने अळ्यांसाठी घरटी बनवतात. इथे आपण
प्लॅस्टिक वापरावर बंदीची भाषा बोलतोय, पण कावळ्याच्या घरटय़ात व्यवस्थित
प्लॅस्टिक अंथरलेलंही बघितलं. प्राणी-पक्ष्यांच्या या नैसर्गिक कुवतीबद्दल
डिस्कव्हरी आणि जिओ चॅनेल्सवर कुतूहलाने पाहिलेलं. मग माकडांच्या
क्षमतेबाबत पटकन अविश्वास का वाटला?
थोडा विचार केल्यावर जाणवलं, कदाचित माकड
हे प्राणी म्हणून बघण्यापेक्षा माणसाचा वंशज म्हणून आपण अधिक लक्षात घेत
असू. त्यामुळे माकड हे इतर प्राणिमात्रापेक्षा अधिक जवळचे. जर माणसालाच
अजून ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ असं ओरडून सांगावं लागतंय, तर ही अक्कल
माकडांना कुठून येणार, अशी ठाम शंका कुठेतरी मनात रुतून असणार. म्हणजे
माकडं शिकवल्यावर चो-या करू शकतात, यावर आपला विश्वास. चिम्पांझीसारखी
माकडांची जात तर गणितंही सोडवू शकते, हे पटवून घेतलेलं. पण माकडांच्या पाणी
अडवण्याच्या क्षमतेवर आपला विश्वास नाही. कारण पाण्याच्या बाबतीत माणसावरच
विश्वास नाही, तर माकडावर कुठून बसणार?
पाणी इथेच मुरत होतं.
मग जी गोष्ट नैसर्गिकरीत्या माकडांना कळते
ती आपल्याला कळायला काय प्रॉब्लेम आहे? थोडक्यात, पाणी अडवणं आणि ते
खेळवणं ही एक नैसर्गिक प्रवृत्ती आहे. पाऊस पडतो तेव्हा आपले डोंगर
आपल्यासाठी ते पाणी स्पंजसारखं स्वत:त जिरवून मग झ-याच्या रूपाने आपल्याला
बहाल करतात. हे झरे, ओहोळ, ओढे प्रवाहित होत नदीला जाऊन मिळतात. आपण नदीला
आज जीवनदायिनी म्हणतो. पण नदी एक मोठा प्रवाह म्हणून वाहायला लागायच्या आधी
तिचे हे छोटे छोटे स्रोतच जगण्यासाठी वापरण्याचं कोष्टक आपल्या जनुकात फार
आधीच फीड करून ठेवलेलं आहे. माकडांच्या या वर्तणुकीतून ते कधीतरी असं
सामोरं येतं. मग माणूस बनण्याच्या प्रक्रियेत उत्क्रांत होताना आपण हे
विसरून गेलो की काय?
खरं तर नदी मानवासाठी जीवनदायिनी झाली ती
खूप अलीकडच्या काळात. साधारण चार हजार वर्षापूवी. नांगराचा शोध
लागल्यानंतर. नांगराचा शोध मानवाला लागला आणि तो शेती करू लागला. अन्नवेचक
समाजातून मानव अन्नउत्पादक झाला. तो मुबलक पाण्याचा स्रोत म्हणून नदीकिनारी
राहायला आला. तिथली जंगलं त्याने शेतीसाठी नष्ट करायला सुरुवात केली. छोटा
स्रोत विसरून मोठ्या पाणीसाठ्याच्या अभिलाषेपायी माणसाची संस्कृती पणाला
लावायला सुरुवातही तिथेच झाली.
त्याआधीचा अन्नवेचक माणूस उंचावरच्या डोंगरातल्या गुहेत राहायचा. खाली नदीजवळच्या जंगलातल्या श्वापदांपासून उंच गुहेत तो स्वत:ला सुरक्षित समजायचा. अन्नवेचक स्त्री थोडीफार शेती करायची. गुहेच्या आसपासच. झ-याचं पाणी शिंपून. पुरुष शिकारीसाठी जंगलात जायचा. झ-याच्या पाण्याजवळ हौद बनवून गरजेपुरतं पाणी गोळा केलं जायचं. गुहेच्या दारात अग्नी प्रज्वलित करून तो अन्न शिजवायलाही शिकला. कधीतरी मग लाकडाचा फाळ निर्माण झाला, मग लोहयुगात त्याचा नांगर झाला आणि पुढे मग नदीवर माणसाचा हक्क प्रस्थापित झाला.
त्याआधीचा अन्नवेचक माणूस उंचावरच्या डोंगरातल्या गुहेत राहायचा. खाली नदीजवळच्या जंगलातल्या श्वापदांपासून उंच गुहेत तो स्वत:ला सुरक्षित समजायचा. अन्नवेचक स्त्री थोडीफार शेती करायची. गुहेच्या आसपासच. झ-याचं पाणी शिंपून. पुरुष शिकारीसाठी जंगलात जायचा. झ-याच्या पाण्याजवळ हौद बनवून गरजेपुरतं पाणी गोळा केलं जायचं. गुहेच्या दारात अग्नी प्रज्वलित करून तो अन्न शिजवायलाही शिकला. कधीतरी मग लाकडाचा फाळ निर्माण झाला, मग लोहयुगात त्याचा नांगर झाला आणि पुढे मग नदीवर माणसाचा हक्क प्रस्थापित झाला.
नदी कह्यात आली आणि माणसाचा इतिहास बदलला.
नदीच्या किना-यावर गावं वसली, नवे देव वसले, गावं गोपुरांनी नटली, गावांची
शहरं झाली. वाहत्या पाण्यावर मालकीहक्काच्या सीमारेषा आखल्या जाऊ लागल्या.
गरजेपेक्षा जास्त पाण्याची सवय लागली. नदीला अटकाव होऊ लागला, पाण्याचे
प्रवाह वळवले जाऊ लागले. मोठ्ठी धरणं, ऊर्जेचे मोठ्ठे प्रकल्प,
कालव्यांच्या योजना, सिंचन प्रकल्प, जंगलंच्या जंगलं शेतीत परिवर्तित करून
ओलिताखाली आणली गेली. इंचनइंच जमिनीवर नांगर फिरू लागला.
माणूस आणि माकडामध्ये एवढा फरक तर राहणारच ना! पण माणसाची नियत आणि माकडाची नियत यातही फरक आहेच.
प्राण्यांना पाण्याची तहान असते. माणसाला
पाण्याची भूक लागली. पाण्याची खेचाखेची करण्याच्या नादात नद्या रोड झाल्या.
वाहत्या पाण्यावरच्या सीमारेषा त्या पाण्याबरोबर आटल्या मात्र नाहीत.
नद्यांवरून माणसांमध्ये तट पडले. मग लोक जमिनीखालची ओल उपसू लागले.
पृथ्वीच्या उदरातलं जीवनही आक्रसलं. शेतीचं सोडा, पिण्याच्या पाण्याचेही
वांधे झाले. जंगलतोडीमुळे पावसाची लहर फिरली. काळे ढग कोरडेच जाऊ लागले. मग
लोकांनी ढगांवर फवारणी केली. तरी पाऊस पडेना. ढगात पाणी नाही, जमिनीत पाणी
नाही, नदीला पाणी नाही, धरणाला पाणी नाही, नळाला पाणी नाही. थुंकी गिळायची
वेळ आली तर तोंडचं पाणीही पळालेलं.
संशोधक सांगतात.. हवेतच खूप सारं पाणी आहे.
संशोधक सांगतात.. हवेतच खूप सारं पाणी आहे.
अभ्यासक सांगतात.. ही पृथ्वी सत्तर टक्के पाण्याने व्यापलेली आहे.
बुद्धिमंत सांगतात.. तिसरं महायुद्ध होईल ते पाण्यावरूनच.
ही तर पाण्याची खूप मोठी माणूसचेष्टा झाली!
No comments:
Post a Comment