*कृष्णा - माणगंगा नदी जोड सुधारीत प्रकल्प*
कोयना धरणाच्या पाणलोटातील सोळशी नदी वर धनगरवाडी गावाजवळ एक वळण बंधारा बांधून साडे आठ किलोमीटर लांब बोगदा धोम धरणापर्यंत काढायचा. धोम धरण हे कृष्णा नदीवर सातारा जिल्ह्यात वाई च्या वरच्या बाजूला आहे.पुढे धोम धरणापासून ८५ कि.मी. दुसरा बोगदा काढावा. याच बोगद्याला ७६व्या किलोमीटरला दरुज-वाकेश्वर गावाजवळ पिंगळी नदीपर्यंत १५ किलोमीटर चा आणखी एक उपबोगदा काढावा. ही पिंगळी नदी गोंदावले बुद्रुकजवळ माणगंगेला मिळते. ते अंतर साधारणत: ४.५० कि.मी. इतके आहे. त्यामुळे गोंदावले बुद्रुकपासून माणगंगेवरील सर्व मध्यम, लघू पाटबंधारे, तलाव आणि कोल्हापूर पध्दतीच्या बंधारे यांना पाणी मिळेल. तसेच दुसऱ्या बाजूला धोमकडून येणाऱ्या या मुख्य बोगद्यातून ८५ कि.मी.वर फक्त १०० मीटर लांबीचा आणखी एक पोटबोगदा काढून वडूज गावाजवळ लेंडूर ओढ्याजवळ पाणी येरळवाडी तलावात सोडले तर ते पुढे येरळेला जाते. त्यामुळे या नदीलाही मिळेल.येरळा ही कृष्णेची उपनदी असली तरी मुळात माणदेशातील आहे. या नदीच्या एकूण १०० कि.मी. लांबीपैकी या प्रकल्पातून वडूज ते ब्रम्हनाळ अशा ६८ कि.मी.च्या पात्राला थेट पाणी देता येईल.
तसेच राजेवाडी तलावाच्या सांडव्याजवळ एक पंप गृह उभा करून माणगंगेचे पाणी साधारणपणे २२०ते २२५ मीटर लिफ्ट करून उघड्या पाटाने अगर बंदिस्त पाईपलाईन द्वारे खरसुंडी जवळच्या ओढ्यात टाकायचे. ते पाणी पुढे घाणंद संतुलन तलावात येईल. तेथून पुढे टेंभू योजनेच्या सर्व कालव्यांचा वापर करून पाणी सर्वत्र देता येईल. दुसरीकडे जांभुळणी तलावातून बाहेर पडलेले पाणी थेट आटपाडी तलावात जाईल. हा तलाव भरल्यानंतर पुढे शुक ओढ्यामार्गे आटपाडी शहराच्या पूर्वेस माणगंगा नदीला जाईल. त्याच वेळी पिंगळी नदीतून राजेवाडी तलावामार्गे आटपाडी तालुक्याच्या उत्तर भागातून फिरून एकत्रित पणे आलेले पाणी माणगंगेतून सोलापूर जिल्ह्याकडे जाईल. कृष्णा माणगंगा नदी जोड प्रकल्पा द्वारे अगदी ३० टीएमसी पर्यंत सुद्धा पाणी वळवून कृष्णा आणि कोयना नदीचा महापूराला अटकाव करता येईल, असा दावाही बारमाही माणगंगा अभ्यास पथकाने केला आहे.
*एकूण बोगदे -४*
* पाणी उपसा स्किम -१*
* कृष्णा-कोयनेच्या महापुराचे एकूण पाणी वळवणे -३० टीएमसी किंवा त्यापेक्षा जास्त
बोगद्याचा व्यास जेवढा मोठा तेवढया मोठ्या प्रमाणात पाणी वळवू शकतो*
*योजनेसाठी फार मोठा वीजेचा वापर नाही, राजेवाडी तलावावर १२० मीटर उंचीच्या लिफ्ट साठी अत्यंत कमी वीज लागेल, अगदी सौर ऊर्जा किंवा पवन ऊर्जा किंवा आपण या प्रकल्पाच्या एकूण उताराचा उपयोग करून पाण्याद्वारे वीज निर्मिती करू शकतो*
*या प्रकल्पात लागणारी बहुतांश जमीन ही वनजमीन किंवा शासकीय जमीन आहे त्यामुळे भूमी संपादनाचा प्रश्न फार मोठा नाही*
No comments:
Post a Comment