सातारा - माण, खटाव, उत्तर कोरेगाव
तालुक्यात पडलेला दुष्काळ आता निधी अन् योजनांचा सुकाळही जन्माला घालू
लागला आहे. राज्यस्तरीय सामाजिक कार्यकर्ते व सुसज्ज जिल्हा प्रशासन
दुष्काळावर मात करण्यासाठी कसोशीने प्रयत्नात असून, त्यांनी माणगंगा
पुनरुज्जीवनाचाही निर्धार केला आहे. राजस्थानी पॅटर्ननुसार उगमस्थान
कुळकजाई ते सरकोली (ता. पंढरपूर) येथपर्यंत विविध उपाययोजना केल्या जाणार
असून, सातारा जिल्ह्यातील कुळकजाई ते आटपाडीपर्यंत 71 किलोमीटर नदीचा
समावेश आहे.
राजस्थान पॅटर्नच्या धर्तीवर अनेक वर्षांपासून माणदेश दुष्काळात होरपळत आहे. 1972 मध्ये पडलेल्या तीव्र दुष्काळात जागे झालेल्या शासनाने जलसंधारणाची कामे केली; परंतु दुष्काळाची तीव्रता कमी करण्यासाठी ती कामे अपुरीच पडली. आता पुन्हा एकदा 2012 च्या दुष्काळाने माणदेशी जनतेला, पशुधनाला जगणे नकोसे केले आहे. हीच परिस्थिती राजस्थानमध्ये होती. "पाणीवाले बाबा' म्हणून संबोधल्या जाणाऱ्या राजेंद्रसिंह यांनी राजस्थानमधील शेकडो नद्या पुनरुज्जीवित केल्या. श्री. सिंह हे पुणे येथे महसूल आयुक्त प्रभाकर देशमुख यांना भेटले होते. त्या वेळी सांगली आणि सातारा जिल्ह्यांतील दुष्काळी नद्यांचे पुनर्भरण करण्याविषयी चर्चा झाली. ज्याप्रमाणे राजस्थानमध्ये जलक्रांती झाली, तीच क्रांती सातारा, सांगली जिल्ह्यांतही करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन श्री. सिंह यांनी त्या वेळी दिले. माणगंगा परिक्रमानुसार उपाय सांगोला येथील सेवानिवृत्त प्राचार्य डॉ. अप्पासाहेब पुजारी व त्यांच्या सहकाऱ्यांनी काही वर्षांपूर्वी माणगंगा नदीची परिक्रमा केली होती. त्यामध्ये त्यांनी अनेक बाबींचा अभ्यास करून माणगंगा जास्त कालावधी कशी वाहती राहील, यासाठी उपाययोजना आखल्या आहेत. समस्यांनी ग्रासलेली माणगंगा माणगंगा नदीपूर्वी दुथडी भरून वाहायची, असे जुने जाणकार सांगतात. आता मात्र, ही नदी एक-दोन महिनेच वाहते. प्रचंड प्रमाणात वाढलेला वाळू उपसा, लोकांची नदीबाबतची अनास्था, वृक्षतोड, नदीपात्रात अतिक्रमण, प्रदूषण (शौच), गाळाने भरलेले बंधारे, गळती लागलेले बंधारे आदी समस्यांनी माणगंगा ग्रासली आहे. पुनरुज्जीवनासाठी काय करणार माणगंगेचे पुनरुज्जीवन करण्यासाठी प्रामुख्याने ग्रामस्थांच्या मदतीने नदीकाठची अतिक्रमणे दूर केली जातील. विषारी वनस्पतींचा नाश, वाळू उपसा थांबवणे, केटी वेअर बंधाऱ्यांची दुरुस्ती, गाळ काढणे, नदीची खोली वाढविणे, नदीकाठी झाडे लावणे, शौच, अंत्यविधीची राख, जनावरे- कपडे धुणे, गटारे, औद्योगिक वसाहतीतील पाणी सोडणे आदी प्रकारचे प्रदूषण थांबवण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. 71 किलोमीटरचा समावेश माणगंगा नदीचा उगम माण तालुक्यातील कुळकजाई येथे झाला आहे. तेथपासून आटपाडीपर्यंत सातारा जिल्ह्यात 71 किलोमीटर नदीचा समावेश होतो. यामध्ये 18 गावे येत असून, या गावामध्येही बैठका घेऊन जनजागृती केली जाईल. गावकऱ्यांच्या लोकसहभागातून अनेक उपाययोजना हाती घेतल्या जाणार आहेत. ही नदी 164 किलोमीटर वाहत जाऊन सरकोली (ता. पंढरपूर) येथे भीमा नदीला मिळते. तिन्ही जिल्हाधिकाऱ्यांची शिखर समिती दरम्यान, जिल्हाधिकारी डॉ. एन. रामास्वामी यांनी सामाजिक कार्यकर्ते डॉ. अप्पासाहेब पुजारी, श्री. घोंगडे, श्री. सूर्यवंशी, श्री. शिंदे व रोजगार हमी योजनेचे उपजिल्हाधिकारी श्रीमंत पाटोळे, प्रांताधिकारी धनाजी पाटील व विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची माण येथे बैठक घेतली. प्राथमिक बैठक झाली असून, विविध विभागांमार्फत उपाययोजना राबवण्यासाठी आराखडा केला जाणार आहे. या संदर्भात सातारा, सांगली, सोलापूर या तिन्ही जिल्हाधिकाऱ्यांची शिखर समितीही केली जाणार असून, राजस्थान, शिरपूर पॅटर्न राबवला जाईल. सामाजिक कार्यकर्ते, जिल्हा प्रशासनाने माणगंगाचे पुनरुज्जीवन करण्याचा निर्धार केला असून, तो यशस्वी झाल्यास माणगंगा पुन्हा आठ ते नऊ महिने खळखळून वाहेल. |
No comments:
Post a Comment